माणूस एकच पण त्याबद्दलची मते इतकी टोकाची? वेगवेगळी? परस्परांना छेद देणारी?
हे कसं होऊ शकतं?
आज अचानक राजीवचं हस्ताक्षर समोर आलं. अन् मन कासाविस झालं.
आठवणी येण्यासाठी एक छोटंसं कारणही पुरेसं ठरतं. आज त्याचं सुवाच्च हस्ताक्षर निमित्त ठरलं. असा तो कसा काय जाऊ शकतो? त्याला हा हक्क कोणी दिला? त्याला जायचं नसेल तर त्याला खेचून नेणारं कोण होतं?
राजीव बँकेच्या कामासाठी बाहेर पडला होता, त्याच्या बाईकवरून. मलाही सोबत घेतलं होतं. तो बँकेत गेला. गाडीच्या पार्किंगचा प्रश्न होता. मी बाईकवरच थांबलो. डोळ्यांवर गॉगल होताच. तो काम संपवून आला. दोन मिनिटं माझ्याकडं पहातच राहिला. मग म्हणाला, ‘असा छान दिसतोयस, गाडी तूच वापरत जा!’
सवय होते, करून घ्यावी लागते. आपण फक्त कठपुतळीसारखं नियतीच्या इशाऱयावर नाचायचं. तिच्याविरोधात जायला आपल्याला संधीच नाही. तितकी ताकदच नाही दिलेली आपल्याला.
मग आपणच आठवणींची संदुक काढून मनाची समजूत काढायची. जुन्या जखमांची खपली निघणार नाही, याची काळजी घेत झालेल्या नव्या जखमांना गोंजारायचं. त्यांचं दुःख करायला वेळ तरी कुठे आहे?
सुभाष धुमे म्हणतात त्याप्रमाणे उद्या असलो तर उद्याचा विचार!
खरे आहे. धुमे आपण म्हणता, ते एकदम पटले. आणि म्हणूनच आज हे लिहू शकतोय. नाहीतर भविष्याचा विचार करता-करताच आयुष्य केव्हा संपलं असतं, कळलंही नसतं.
बरं झालं असतं, संपलं असतं तर असं म्हणताही येत नाही अन् ते असं संपवताही येत नाही. तेही आपल्या हातात नाही.
म्हणूनच म्हटलं, पुन्हा नव्यानं नव्याची सुरुवात करायची.
भूतकाळात डोकावायचं, काही क्षण भावव्याकूळ व्हायचं, आणि मग पुन्हा फिनिक्ससारखं आकाशात भरारी मारण्यासाठी सज्ज व्हायचं.
आपट्यांची धनश्री आणि माझे सर्वस्व असलेली सानिया, आज कुठं आहे, माझ्यासोबत? पण जगतो आहेच की?
कोणे एके काळी सर्वस्व असणारी सानिया आज आयुष्यात नाहीच, कल्पनाच करवत नाही. पण शेवटी ती वस्तुस्थिती आहे. मान्य करायलाच हवी. ‘आयुष्य तेच आहे…’ असं म्हणत जगत रहायचं.
मनाची सारी कवाडं
बंद केलीयेत आता
पुन्हा तुझ्या विचारांची धूळ उठायला नको
तुझीच प्रतिमा मलीन व्हायला नको…
आपण आपले म्हणून गेलो, पण अशी मनाची कवाडे कायमची सोय असती तर?
कोणी काही म्हणोत, पण आता आपण इथं भेटणार आहोत. किमान मी तरी सानियाला इथं भेटणार आहे. माझ्याकरिता तरी ती आहेच. मग तिच्यासाठी तरी इथं रोज भेटायला हवं. तिच्याशी संवाद साधायला हवा…
एक अभिप्राय
Hi, this is a comment.
To delete a comment, just log in, and view the posts’ comments, there you will have the option to edit or delete them.