अगदी सहज आठवणी अशा मनात दाटून येतात, काहीही निमित्त पुरतं. आपण वर्तमानात जगत असतो खरे पण मनानं आपण भूतकाळातच असतो. घडणाऱया प्रत्येक घटनेचा संदर्भ आपण मागे घडून गेलेल्या गोष्टींशीच लावण्याचा प्रयत्न करीत असतो.
माणूस बदलू शकतो, यावर आपला विश्वासच नाही. प्रत्यक्षात आपल्यासोबत जे दिवसातले २४ तास एकत्र असतात, त्यांचा विश्वास बसत नाही, मग बाकीच्यांची काय कथा?
काडीची लायकी नसलेली माणसं आपल्याबाबत मतांची एक पिंक टाकून जातात, त्यावेळी खरंच अस्वस्थ व्हायला होतं. कोण हा? याचा काय संबंध? हा असा कसा काय बोलू शकतो? अनेक प्रश्न मनात उपस्थित होतात, छळत राहतात.
आणि किती जणांना प्रत्युत्तर देणार आपण?
माझा तरी प्रत्यक्ष काही बोलून उत्तर देण्यापेक्षा कृतीने उत्तर देण्यावर भर राहिलाय. चारशे हजार चारशे शब्द बोलून जे साध्य होत नाही, ते आपल्या एका समर्थ, यशस्वी निर्णयातून साध्य होतं.
मानवी मन अनाकलनीय हेच खरं. आज इतकी माणसं आहेतही आणि नाहीतही.
मी रात्री उशिरा १.२० वाजता हे लिहितोय, मनाच्या कोपऱयातल्या साऱया आठवणी गोळा करून त्यांना मांडतोय. का? कशासाठी?
कारण सोप्पं आहे. या जगात आपलं कोणीही नाही, याचा आज पुन्हा एकवार नव्यानं साक्षात्कार झालाय. तसा तो रोजच होत असतो. म्हणून म्हटलं नव्यानं साक्षात्कार झालाय.
आपल्या भूतकाळात आता डोकावायचं आहे. काही साधकबाधक सर्वांसमोर मांडायचे आहे. आपण केलेल्या चुका दुसऱया कोणाकडून व्हायला नकोत, अशी अपेक्षा अर्थातच आहे.
कोणीही कुणासाठी काहीही फुकट करत नाही. प्रत्येकजण काहीना काही स्वरुपात त्याचा मोबदला ठणकावून वाजवून घेत असतो, हे सूत्र लक्षात ठेवले की मग काही हिशेब सहज जमतील जगण्यामागचे. आणि करणे हे केवळ आर्थिक स्वरुपातच असते असे नाही, हे लक्षात ठेवले की झाले.